मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. अखेर सरकारने पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सध्या तरी पात्र महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता म्हणून १५०० रुपये मिळत आहेत.
ई-केवायसी पडताळणीतील अडचणी आणि मुदतवाढ
ऑक्टोबर 2025 पासून ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांना हप्ता मिळण्यात अडचणी येत होत्या. यात ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या.
ई-केवायसी करताना अनेक महिलांनी फॉर्म चुकीचा भरला होता. 'तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी करत नाही ना', या प्रश्नावर 'नाही' ऐवजी अनेकांनी होकारार्थी पर्याय निवडला होता. यामुळे असंख्य पात्र महिलाही अपात्र ठरल्या होत्या.
नंतर ही चूक दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
लाभार्थी संख्येत घट आणि हप्त्याला विलंब
गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2.4 कोटींहून अधिक लाभार्थी महिला होत्या. परंतु, ई-केवायसीद्वारे पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2025 महिन्यात फक्त 1.6 कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला.
जानेवारी महिन्यात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता तेव्हा प्रलंबित होता.
फेब्रुवारी महिना संपत आला तरी जानेवारीचा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबतचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
Comments